पद्मश्री माजी राज्यपाल, शिक्षण महर्षी, डॉक्टर डी. वाय.पाटील दादा यांचे दुःखद निधन.
कोल्हापूर | महाराष्ट्र न्यूज नेटवर्क | ४ ऑगस्ट २०२६
शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, क्रीडा आणि सार्वजनिक जीवनात आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटवणारे माजी राज्यपाल, पद्मश्री, शिक्षणमहर्षी आणि कोल्हापूरचे सुपुत्र मा. डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांचे आज, मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट २०२६ रोजी कोल्हापूर येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून विविध क्षेत्रांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
अंतदर्शन व अंत्यसंस्काराचा कार्यक्रम
डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंतदर्शन बुधवार, दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० वाजेपर्यंत त्यांच्या यशवंत निवास, कसबा बावडा, कोल्हापूर येथील राहत्या घरी ठेवण्यात येणार आहे.
अंतयात्रा दुपारी ४.०० वाजता राहत्या घरापासून सुरू होईल.
अंत्यसंस्कार सायंकाळी ५.०० वाजता डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर येथे करण्यात येणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील युगपुरुष
डॉ. डी. वाय. पाटील यांनी १९८३ मध्ये डी. वाय. पाटील ग्रुपची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या नेतृत्वाखाली १८० हून अधिक शैक्षणिक संस्था आणि ७ हून अधिक नामांकित विद्यापीठे उभी राहिली. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शिक्षण सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते.
राजकारण आणि घटनात्मक जबाबदाऱ्या
डॉ. पाटील यांनी कोल्हापूरचे महापौर तसेच तीन वेळा आमदार म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी बिहार, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांचे राज्यपाल म्हणून घटनात्मक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
आरोग्य, समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रातील योगदान
आरोग्यसेवेत त्यांनी आधुनिक मल्टी-स्पेशालिटी रुग्णालयांची उभारणी करून हजारो-लाखो रुग्णांना उपचाराची सुविधा उपलब्ध करून दिली. समाजसेवेची त्यांची परंपरा अनेक उपक्रमांतून आजही जिवंत आहे.
क्रीडा क्षेत्रालाही त्यांनी मोठे योगदान दिले. नवी मुंबई येथे उभारलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे डी. वाय. पाटील स्टेडियम हे त्यांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानले जाते.
पद्मश्रीने गौरव
शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय कार्याची दखल घेत भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित केले.
कसबा बावडा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या डॉ. डी. वाय. पाटील यांनी अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि समाजसेवेच्या बळावर देशभरात मानाचे स्थान मिळवले. त्यांचे कार्य भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्ककडून पद्मश्री, माजी राज्यपाल आणि शिक्षणमहर्षी डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
