August 30, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:किशोरावस्थेतील रागातून नात्यांवर कायमस्वरूपी डाग पडू देऊ नका

0
1788100859_phg0ry_1788027981.jpg

शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही एखाद्या पबमध्ये काही तास नाच-गाणे करून थकून घरी परतता. घरी पोहोचल्यावर तुम्हाला दिसते की मुख्य दरवाजा अजूनही उघडा आहे. आत शिरताना तुम्ही पुटपुटता – “बेजबाबदार! ’ पण ही खरी गोष्ट ही नसते. खरी गोष्ट ही की तुमच्या वडिलांनी हॉलच्या खिडकीतून तुम्हाला तुमच्या मित्राच्या बाईकवरून किंवा टॅक्सीतून उतरताना पाहिले होते. त्यांना रात्री 2 वाजता तुमच्याशी कोणतीही चर्चा करायची नव्हती. पण संध्याकाळी 8 वाजता जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडला होतात, तेव्हापासूनच त्यांच्या नजरा दरवाजावर लागल्या होत्या. ते आपल्या लाडक्या मुलीच्या परतण्याची वाट पाहत होते. जेव्हा तुम्ही शेवटी सुखरूप घरी पोहोचला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. तो दिलाशाचा एक शांत सुस्कारा होता. त्यांनी देवाचे आभार मानले आणि झोपायला गेले. पण ते अजून झोपलेले नाहीत. कदाचित ते वाट पाहत आहेत की तुम्ही त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावाल आणि म्हणाल – “सॉरी डॅड, मला उशीर झाला.” पण याऐवजी तुम्ही तुमच्या खोलीचा दरवाजा बंद करता आणि रविवारच्या दुपारपर्यंत झोपून राहता. वडील सकाळी ६ वाजताच उठून शनिवार-रविवारची महत्त्वाची कामे उरकण्यात लागलेले असतात. अनेक कुटुंबांमध्ये शनिवार-रविवार काहीसे असेच जातात. मुलांना वाटते की आई-वडील त्यांच्या स्वातंत्र्यात ढवळाढवळ करत आहेत. आई-वडिलांना वाटते की मुले त्यांची काळजी समजूनच घेत नाहीये. आणि या सगळ्यामध्ये प्रेम, रागाच्या थरांखाली कुठेतरी दबून जाते. मला नुकतेच भोपाळमध्ये आयोजित एका इंडक्शन कार्यक्रमादरम्यान जाणवले की आई-वडील आणि मुलांमधील हे अंतर किती वाढलेय. मी तिथे मुलांना विचारले की ज्यांना असे वाटते की त्यांचे आई-वडील, विशेषतः वडिलांसोबत त्यांचे नाते दुरावले आहे, त्यांनी हात वर करावेत. मला अपेक्षा होती की काही हात वर येतील. पण शेकडो हात एकाच वेळी वर आले. ते दृश्य विसरणे कठीण होते. ही अशी मुले नव्हती, ज्यांनी आपल्या वडिलांवर प्रेम करणे बंद केले होते. ही मुले फक्त त्या वयात पोहोचली होती, जिथे आई-वडिलांचा प्रत्येक सल्ला त्यांना ढवळाढवळ वाटू लागतो. तर किशोरावस्थेतील स्वैराचाराचे प्रत्येक कृत्य आई-वडिलांना धोक्यासारखे दिसू लागते. 12 ते 1६ वर्ष वयोगटातील मुलांचे आपल्या आई-वडिलांशी भांडणे स्वाभाविक आहे. हा मोठे होण्याच्या प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्यांना स्वातंत्र्य हवे असते, खासगीपणा हवा असतो आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचा अधिकार हवा असतो. तर आई-वडिलांनी अजूनही त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलेली असते. मी काही वह्यांमध्ये लिहिलेले पाहिले – “आय हेट माय फादर. ’ कदाचित त्या लहान मुलाने असा विचार केला नसेल की जर त्याच्या वडिलांनी नकळत हे शब्द वाचले तर त्यांच्यावर काय बेतेल. ज्या आई-वडिलांनी मुलांसाठी अनेक वर्षे आपल्या सुख-सुविधा, पैसा, झोप आणि अनेकदा आपल्या स्वप्नांनाही मागे ठेवले असेल, त्यांच्यासाठी असे शब्द एखाद्या घावापेक्षाही खोल जखम देऊ शकतात. ते कदाचित स्वतःलाच विचारतील की आपल्या मुलासाठी एवढे करूनही तो माझ्याबद्दल असाच विचार करतो का? म्हणूनच मुलांनी आपला राग व्यक्त करताना थोडे सावध राहिले पाहिजे. राग तात्पुरता असतो, पण लिहिलेले शब्द कायमस्वरूपी आठवण बनू शकतात. आई-वडिलांसोबत आपले नाते जपण्याच्या महत्त्वावर मुलांशी बोलताना मला हे सत्य पुन्हा एकदा दिसले. माझ्यासमोर ती मुले होती, जी आता आपले कॅम्पस जीवन सुरू करणार होती आणि स्वातंत्र्याच्या एका अगदी नवीन जगात पाऊल ठेवण्यासाठी तयार होती. पण त्यांच्या मागे ते आई-वडील उभे होते, ज्यांनी त्यांना इथपर्यंत पोहोचवले होते. बोलता-बोलता माझी नजर अशा किमान 50 जणांवर पडली, जे गुपचूप आपले अश्रू पुसत होते. अनेक वर्षे त्यांनी आपल्या मुलांचा हात धरून ठेवला होता. आता त्यांना त्यांचा हात सोडून देण्यास सांगितले जात होते. कदाचित त्या अश्रूंनी ते सर्व काही सांगून टाकले, जे मुलांना अजूनपर्यंत समजले नव्हते. फंडा असा आहे की, गरज पडल्यास आपल्या आई-वडिलांशी भांडून घ्या. त्यांच्याशी असहमती दर्शवा. आपले स्वातंत्र्यही मागा. पण जेव्हा राग उतरेल, तेव्हा परत जा आणि त्यांना सॉरी म्हणा. कारण रात्री 2 वाजता उघड्या दरवाजाच्या मागे तुमची वाट पाहणारे लोक तुमचे शत्रू नाहीत. ते तेच आहेत, जे तुम्ही सुखरूप घरी परतावे म्हणून प्रार्थना करतात.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!