November 1, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:शिष्टाचार हीच जगाची गुप्त गुरुकिल्ली

0
nraghuraman_1792953193.jpg

मला वाटते, नक्कीच तसे झाले आहे. आजच्या स्वार्थी जगात ‘थँक्यू’ सारखे दोन साधे शब्द जणू मागे पडत चालले आहेत. इतरांनी आपल्याला मदत करावी, सेवा द्यावी आणि सामावून घ्यावे, अशी अपेक्षा असते. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांची दखल घ्यायला आपण विसरून जातो. हास्यकलाकार आणि लेखिका एमी पोलर यांच्या ‘यस प्लीज’ पुस्तकात एक सुंदर विचार मांडला आहे. त्या लिहितात, “चांगल्या सवयी हीच जगाची गुप्त गुरुकिल्ली आहे.’ आपली मुले नम्र आणि सुसंस्कृत असावीत, असे त्यांना का वाटते हे त्यांनी स्पष्ट केले आहे. चांगल्या सवयी म्हणजे केवळ सामाजिक नियमांचे पालन करणे नव्हे. यामुळे परस्परांशी चांगले संबंध निर्माण होतात आणि सर्वांचेच आयुष्य अधिक सुंदर बनते. ‘हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यू’ मध्ये लेखक पीटर ब्रेगमॅन यांनी आभार मानण्याच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. ते म्हणतात की, ‘थँक्यू’ म्हणणे म्हणजे केवळ एखाद्याच्या कष्टांचे किंवा कामाचे कौतुक करणे नाही, तर त्या कामामागे उभ्या माणसाचा सन्मान करणे होय. अशी ओळख मिळाल्यामुळे कष्ट मोलाचे आहेत, अशी भावना त्या व्यक्तीच्या मनात निर्माण होते. आपल्या विचारांनी अनेक पिढ्यांना प्रभावित करणाऱ्या शिष्टाचार तज्ज्ञ एमिली पोस्ट यांनीही इतरांची काळजी घेण्यावर आणि स्वाभिमानावर भर दिला होता. चांगल्या सवयी म्हणजे जेवताना कोणता काटा वापरावा किंवा औपचारिक नियमांचे किती काटेकोर पालन करावे, एवढेच नाही तर आपण माणसांशी कसे वागतो याला खरा अर्थ आहे. रोजच्या आयुष्यातील काही साध्या प्रसंगांचा विचार करा. येथे आपली नम्रता मोठा फरक पाडू शकते. दरवाजा उघडून देणारा सुरक्षा रक्षक असो, परिसर स्वच्छ ठेवणारे स्वच्छता कर्मचारी असो, वेळेवर काम पूर्ण करायला मदत करणारे सहकारी असोत किंवा तुमच्यासाठी दरवाजा धरून ठेवणारी एखादी अनोळखी व्यक्ती असो.. या सर्वांना आवर्जून ‘थँक्यू’ म्हणा. कोणतीही गोष्ट हवी असेल तर ‘प्लीज’ म्हणा. चूक झाल्यास मनापासून माफी मागा. कोणाचेही बोलणे मध्येच न थांबवता पूर्ण ऐकून घ्या. या छोट्या गोष्टींसाठी काही खर्च येत नाही. पण यामुळे कोणाचा तरी पूर्ण दिवस आनंदात जाऊ शकतो. विचार करा. बदल्यात थोड्या कृतज्ञतेची अपेक्षा करणे म्हणजे छोटी वृत्ती आहे का? आपण मोठ्या शहरांत राहतो व लहान शहरेही वेगाने वाढत आहेत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळताे. लोकांच्या नजरा फोनवर असतात किंवा कानांत इअरबड्स अडकवलेले असतात. ते खरेच व्यस्त असतीलही. तरीही माझा एक प्रश्न आहे, कोणाच्या तरी छोट्या चांगुलपणाची दखल घेण्यात शेवटी अडचण काय आहे? कल्पना करा, तुम्ही एका अनोळखी व्यक्तीसाठी दरवाजा धरून ठेवता, जेणेकरून तो त्याच्या तोंडावर आपटू नये. पण ती व्यक्ती ‘थँक्यू’ न म्हणता, न हसता आणि मानही न हलवता निघून जाते. त्या छोट्याशा चांगुलपणासाठी आभार मानायला अवघा एक सेकंद लागतो. आपण धावपळीत स्वतःला इतके महत्त्वाचे समजू लागलो आहोत का, की दुसऱ्या माणसासाठी एक सेकंदही काढू शकत नाही?
आपल्या शिष्टाचाराची खरी परीक्षा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी किती नम्रतेने वागतो यात नाही, तर काहीही मिळण्याची अपेक्षा नसलेल्या सामान्य माणसाशी कसे वागतो यात आहे. दरवाजा धरून ठेवणारी व्यक्ती कौतुकाची अपेक्षा करत नसेल, पण तुमचे आभार त्यांना त्यांच्या चांगुलपणाची दखल घेतल्याची जाणीव करून देतात. चांगल्या सवयींचा अर्थ आभाराची अपेक्षा ठेवणे असा नाही, तर मिळालेल्या चांगुलपणाला गृहीत न धरणे असा होतो. फंडा असा की- एकाच समाजात एकत्र राहताना परस्परांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही माणूस म्हणून असलेली मूलभूत जबाबदारी आहे. खरे तर मला माझ्या सर्व वाचकांना मनापासून सांगावेसे वाटते की, “माझा लेख वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप आभार!’ आपल्यापैकी बहुतेकांना एक आठवण नक्कीच असेल. आपण कुटुंबासोबत जेवणाच्या टेबलावर बसायचो. डोळे मिटून बाबांसोबत प्रार्थना म्हणायचो. आपण या प्रार्थनांचा अर्थ विचारायचो. तेव्हा बाबा समजावून सांगायचे. ते म्हणायचे, “कुटुंबाला एकत्र आणले. सर्वांना शांततेत भोजन मिळाले. याबद्दल देवाचे आभार मानण्याची ही पद्धत आहे.’ अशा प्रकारे बालपणीच आपण कृतज्ञता व्यक्त करायला शिकलो. आजही आपण आपल्या मुलांना ‘थँक्यू’ म्हणण्याचे महत्त्व शिकवतो. पण काळाच्या ओघात रोजच्या आयुष्यातून हे सोपे शब्द गायब होत चालले आहेत का?

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!