एन. रघुरामन यांचा कॉलम:तुम्ही तुमच्या मुलांना आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकवला आहे का?
तु म्ही कधी तुमच्या मुलांना ट्रॅफिक सिग्नलवर गुलाब, फुलांचे गुच्छ किंवा किरकोळ वस्तू विकणाऱ्या मुलांकडे बारकाईने पाहण्यास सांगितले आहे का? पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही रात्रीच्या जेवणानंतर घरी परताल, तेव्हा त्यांना वाटेत लागणाऱ्या काही सिग्नल्सवर काय घडते ते पाहण्यास सांगा. कदाचित ते असा धडा शिकू शकतील, जो कोणताही वर्ग शिकवू शकत नाही. किमान मुंबईत तरी हे दृश्य सामान्य आहे. सिग्नल लाल होतो आणि कारची रांग थांबते. गाड्यांच्या आत लोक एसीच्या आरामात बसलेले असतात. काही जण फोन पाहतात, काही गप्पा मारण्यात मग्न असतात आणि उरलेले लोक सिग्नल हिरवा होण्याची वाट पाहत समोर पाहत राहतात. पण बाहेर एक वेगळीच दुनिया जिवंत होते. फिका शर्ट आणि फाटकी पँट घातलेला एक मुलगा अनवाणी पायांनी घाईत गाडी चालवणारे आणि भरधाव दुचाकींपासून वाचत कारच्या मध्ये वेगाने धावतो. त्याच्या एका हातात गुलाबांचा गुच्छ तर दुसऱ्या हातात काही छोटी खेळणी किंवा सजावटीच्या वस्तूंची माळ असते. गाड्यांच्या खिडकीवर खिळलेली त्याची नजर अशा व्यक्तीला शोधत असते, जी त्याच्याकडून काहीतरी विकत घेईल. त्याच्यासाठी प्रत्येक वेळी लाल सिग्नल लागणे म्हणजे प्रवासातील थांबा नसून, संधीची एक खिडकी असते. प्रत्येक कारमध्ये बसलेला प्रवासी त्याच्यासाठी संभाव्य ग्राहक असतो. त्यामुळे तो पहिल्या कारजवळ थांबतो आणि हळूच खिडकी ठोठावतो. आत बसलेली व्यक्ती दुसरीकडे पाहू लागते. तो पुढच्या गाडीकडे जातो. तिथे एक माणूस फोनवर व्यग्र असतो. त्याच्या मागच्या कारमध्ये एक जोडपे गप्पा मारण्यात मग्न असते आणि खिडकीतून डोकावणाऱ्या त्या छोट्याशा चेहऱ्याकडे लक्षही देत नाही. कुणी मान हलवून नकार देतो. कुणी चिडचिड करत त्याला बाजूला होण्याचा इशारा करतो. अनेक लोक असे दाखवतात, जणू त्यांनी त्याला पाहिलेच नाही. कुणीही न सांगताच त्याने ‘नाही’ ऐकलेले असते, तरीही तो पुढे जातो. सिग्नल हिरवा होण्यासाठी काही सेकंदच उरलेले असतात, तेव्हा तो आणखी एका कारजवळ पोहोचतो. खिडकीकडे गुलाब पुढे करत एका चमकदार हास्यासह तो म्हणतो की ‘काय तुम्ही मॅडमसाठी ही सुंदर फुले खरेदी करू इच्छिता?’ त्याच्या आवाजात आशा, घाई आणि थोडी निराशाही असते. त्याला माहीत असते की वेळ त्याच्या विरुद्ध आहे. सिग्नल हिरवा होताच कार पुढे निघून जातील आणि पुढचा लाल सिग्नल लागेपर्यंत त्याची संधी संपून जाईल. गाडीत बसलेली व्यक्ती नकार देते, तेव्हा तो हातात पकडलेल्या गुलाबांकडे पाहतो. कदाचित त्याला चिंता सतावत असते की उन्हात आणि धुळीत ही फुले किती वेळ ताजी राहतील. कदाचित तो विचार करतो की कुणी खरेदी करण्यापूर्वी त्याला आणखी किती सिग्नल पार करावे लागतील. एका क्षणासाठी त्याच्या चेहऱ्यावर निराशाही दिसू शकते. पण मग तो स्वतःला सावरतो, पुढच्या कारकडे वळतो आणि पुन्हा एकदा प्रयत्न करतो. पालक म्हणून आपण आपल्या मुलांना विजयासाठी तयार करण्यात वर्षानुवर्षे घालवतो. आपण त्यांना सांगतो की जास्त गुण मिळवा, चांगली कामगिरी करा, प्रवेश निश्चित करा आणि मुलाखतीत यशस्वी व्हा. पण जे लोक त्यांना नकार देतील त्यांच्यासाठी, ज्या संधी ते गमावतील त्यांच्यासाठी आणि जे स्वप्न पहिल्या प्रयत्नात पूर्ण होणार नाही त्यांच्यासाठी आपण त्यांना तयार करतो का? आयुष्य प्रत्येक वेळी ‘होय’ म्हणत नाही. आत्मविश्वास न गमावता ‘नाही’ ऐकायला शिकणे हा आयुष्यातील सर्वात मौल्यवान धड्यांपैकी एक असू शकतो. फंडा असा की, पुढच्या वेळी जेव्हा तुमचे मूल एखाद्या परीक्षेत नापास होईल, एखाद्या स्पर्धेत अपयशी ठरेल किंवा नोकरीची संधी गमावेल, तेव्हा त्याला वाट पाहत असलेल्या त्या कारच्या मध्ये उभ्या असलेल्या त्या मुलाची आठवण करून द्या. त्याला शिकवा की एका नकारामुळे कुणाचेही महत्त्व कमी होत नाही. एका धक्क्याचा अर्थ प्रवासाचा शेवट नसतो.
