August 30, 2026

Balraj Sanghai Column; Understanding Life Values and Human Instincts

0
balraj-sanghai_1784273109.jpg

6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सर्वच प्राणीमात्रांच्या काही प्रवृत्ती असतात. त्यात मूळ प्रवृत्ती म्हणून काही उल्लेख आहेत. जसे की आहार, निद्रा, भय आणि कामसेवन. या मूळ प्रवृत्ती आहेत, त्या सर्वच प्राण्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात विद्यमान असतात.

एकइंद्रिय ते पंचेंद्रीय प्राण्यांमध्ये या प्रवृत्तींमध्ये अनुक्रमे अत्याधिकता दिसून येते. सर्वच प्राण्यांच्या बाल्य आणि संगोपन अवस्थेमध्ये आहार, निद्रा आणि भय या प्रवृत्ती सर्वसाधारण असतात. वयात आल्यानंतर काही प्रवृत्ती बदलतात त्यामध्ये कामसेवन आणि वासना निर्माण होते.

मनुष्य आणि प्राण्यांच्या जीवनामध्ये ही वासनाच संपूर्ण आयुष्यावर राज्य करते. ही वासना अनेक प्रकारची असते, सर्व इंद्रियांच्या बाबतीत अत्याधिक विषयसेवन यामध्ये अंतर्भूत होतात. ऑस्ट्रियन डॉक्टर आणि मानसशास्त्राचे उद्घाटक डॉ. सिग्मंड फ्रॉइड यांनी तर मनुष्य आणि प्राण्याच्या प्रत्येक हालचाल आणि कृती, उद्देशाच्या मागे वासना हेच मूळ असल्याचे सांगितले. ( प्रत्येक साधारण प्रवृत्तीला देखील त्यांनी वासना असेच संबोधन दिले)

प्रत्येक इंद्रियाच्या विषयातील अधिकता म्हणजेच वासनेच्या आहारी जात मनुष्य अनेक व्यावहारिक, नैतिक, सामाजिक इत्यादी मर्यादा ओलांडतो. यामुळेच प्रत्येक प्रवृत्ती मध्ये अधिकता वाढत जाते. अनिवार्यता काय आहे? आवश्यकता काय आहे ? आणि अत्याधिकता म्हणजेच विलासिता, वासना ही अधिक उत्पन्न होत आहे या बाबी तो विसरून जातो.

जसे गहू किंवा धान्य ही अनिवार्यता आहे, त्याची पोळी, चपाती ही आवश्यकता आहे. परंतु त्याचे पदार्थ, व्यंजन, पराठे वगैरे इत्यादी या विलासिता आहेत. वासनेच्या अधिक वृद्धीच्या परिणामस्वरूप हे घटित होते. प्राण्यांचे जीवन हे निसर्गाच्या नियमस्वरूप असावे, मनुष्येतर प्राण्यांमध्ये ते निसर्गाच्या नियमानुसार असते. परंतु मनुष्यामध्ये बुद्धी आणि इंद्रियांची अत्यधिक विकसितता झाल्यामुळे त्यामध्ये ” भौतिकता ” ही वृत्ती काळानुसार निर्माण होत गेली. आज ही प्रवृत्ती मनुष्यात परम सीमेवर दिसून येते आहे.

आपल्या कामाची एक वस्तू असते परंतु त्या प्रकारच्या आपण खूप वस्तू घरामध्ये ठेवतो. एकावेळी एक ड्रेस घालतो परंतु कपाटामध्ये शंभरहून अधिक ड्रेसची थप्पी लागलेली असते. शास्त्रांमध्ये मनुष्य आणि काही प्राण्यांमध्ये संग्रह वृत्ती सांगितलेली आहे. जसे की मुंगी पावसाळ्याच्या सुरुवातीला पुढे लागणाऱ्या खाद्य वस्तूंचा जमिनीखाली संग्रह करून ठेवते. परंतु हे अनिवार्य आहे. सर्वच प्राणी आहाराची खाद्य वस्तू मिळण्याची चिंता करतात परंतु ते पोटाची भूक भागेल इतकीच. मनुष्यामध्ये हे असे दिसून येत नाही. एकावेळी एक वस्तू वापरायची मग बाकीच्या वस्तू कशासाठी? ठीक आहे एक खराब झाली तर दुसरी असावी तिसऱ्या-चौथ्या पासून शंभराव्या पर्यंत कशासाठी?

संग्रह वृत्ती ही इच्छेला मर्यादा नसल्यामुळे निर्माण होते. म्हणून कमीत कमी संग्रह, परिग्रहाचा संकल्प करावा. मी दहा,पंधरा कपड्यांपेक्षा जास्त ठेवणार नाही. संकल्प यासाठी की तुम्ही ठरवलेल्या नियमापेक्षा जगभर अधिक निर्माण होणाऱ्या वस्तू उत्पादनासाठी जी हिंसा घडते त्याचे भागीदार तुम्ही नसता. म्हणून इच्छा परिमाण व संग्रह सीमा हे गृहस्थासाठी व्रत आहेत. या व्रतांचा अंगीकार करणे अथवा त्यांचे मानसिक, कौटुंबिक सामाजिक स्वास्थ्य आणि संतुलनाच्या बाबतीत महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)

(संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!