Balraj Sanghai Column | Co-existence of Opposites & Life Philosophy
5 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

चांगल्या सोबत वाईट येणारच. सुखाच्या मागे दुःख येणारच…म्हणजे अटळ होते. म्हणजे सोबतच होते. जे सोबत आहे त्याला टाळून कसे चालणार. असे नव्हे तर त्याला नियम म्हणून स्वीकारायला हवे. वास्तविक पाहता संवेदनेला सुख आणि दुःख हे नाव आपणच दिले.
शरीर आहे परंतु काळाच्या प्रभावाने त्याच्या अवस्था बदलतात. म्हणून जन्मासोबत जरा म्हणजेच म्हातारपण, जर्जर होणे आहे. आणि जरा सोबत मृत्यू आहे. सौंदर्यासोबत अभिशाप आहे. ऊन-सावलीला आपण खेळ म्हणतो, तो खेळ नसतो, ते एका आश्रयाला एका जागेवर दोन अस्तित्व असतात. एक अदृश्य झाल्यावर दुसरे प्रकट होते. सुख आणि दुःखाचे असेच आहे.
तपस्वी गर्मीत ही साधना करतो. आपल्याला एसीतही घाम फुटतो. सुखाला सुख मानता आलं पाहिजे दुःखालाही दुःख न मानता ते गृहीत धरून त्याचे सुखात रूपांतर करता आले पाहिजे. आणि हे रूपांतर करण्यापेक्षाही महत्त्वाची एक गोष्ट आहे,ती म्हणजे समत्व आणि समभाव.मानलं तर दुःख आहे तुम्ही मानलं तर पूर्ण वेळ सुख आहे.
माणूस लाभामध्ये सुख आणि अ-लाभांमध्ये दुःख मानतो.प्राप्तीमध्ये सुख आणि अ-प्राप्तीमध्ये दुःख मानतो. मनाप्रमाणे घडले तर चांगले पण मनाच्या विरुद्ध घडले तर वाईट. थोडक्यात अपेक्षापूर्तीमध्ये सुख आणि अपेक्षाभंगांमध्ये दुःख असेच मनुष्य मानतो.
नाण्याला दोन बाजू नसतातच. ते पूर्ण नाणं असतं. आपल्या व्यवहारासाठी आपण त्याला दोन बाजू दिल्या. बाजू हा आपला दृष्टिकोन आणि व्यावहारिक उपयोग. माणसांनी प्राण्यांना नाव दिले. प्राणी नाव घेऊन जन्माला आले नव्हते. नाहीतरी माणसाला सगळं आपल्या सोयीप्रमाणे असावं वाटतं. आणि जिथे सोय होत नाही तिथेच दुःखाचा जन्म होतो.
जगातला एक सर्वात मोठा सिद्धांत आहे, आणि तो हा की: “विरोधी युगलांचे सह-अस्तित्व असते ” अंधकार आणि प्रकाश, ऊन सावली, सुख दुःख, जन्म मृत्यू, प्रेम विरह, अस्तित्व नास्तित्व, जीव आजीव, गति स्थिती… इत्यादी अनेक जितक्या परस्पर विरोधी गोष्टी आहेत तितक्यांचे सह-अस्तित्व असते आणि दोन्ही एकाच वेळी एका जागी असतात. सुख आणि दुःख सोबत राहणारच. बरे आणि वाईट केव्हाही कोणतेही अनुभव हे का पाठोपाठ येणारच कारण ती सोबतच होते. हे नियमानुसार मानून चालावे.
सर्व तत्वांचे सर्वसमावेशक व्यापक असा हा अस्तित्वाचा सिद्धांत प्रत्येकाने मान्य करायला हवा. या मान्यतेनुसार मनाला प्रशिक्षित केलं तर समत्व भावाचे आणि सुखच सुख असेल.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
(संपर्क- 9420015108)
