Balraj Sanghai Column | Universe Master Plan & Rules Of Living
2 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

सर्वांच्या आयुष्यात ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार, पात्रतेनुसार नशीब किंवा प्रारब्धानुसार कोणाचे तरी स्नेहबंध-संबंध असतात. परंतु त्यातील आपले आवडते संबंध आपल्या रुचीनुसार, आपल्या भावनांच्या दृष्टीनुसार कायम राहावेत आणि त्यांनी फक्त आपलंच असावं, आपल्याशीच संबंध ठेवावेत किंवा जास्त वेळ आपल्याला द्यावा अशी आपली आंतरिक इच्छा असते. कदाचित याला सुद्धा काही जण प्रेम समजतात.
परंतु जग कसे चालायचे हे ठरलेलं आहे. निसर्ग असो अथवा कोणी जगाचा नियंता असो, त्याच्या नियमानुसार कोणत्या क्षणी काय घडणार हे निश्चित आहे. ते घडणं मात्र अटळ असतं. हे घडवणाराच विधाता म्हटलं तरी चालेल. एका अदृश्य शक्तीच्या नियमाने, नियंत्रणाने जग चालत असतं.
युनिव्हर्सचा मास्टर प्लॅन जसा असतो त्याप्रमाणे तो चालतो. यातच परस्पर संबंध सुद्धा आले. दोन जीवांचे, पशु-पक्षी प्राण्यांचे, जीवासोबत आजीवांचे सह-अस्तित्व हाही त्याचाच भाग आहे.
कुणाचा ऋणानुबंध-संबंध किती दिवसांचा यूनिवर्सच्या मास्टर प्लॅनमध्ये आहे? हे आपल्याला माहिती नसतं. ते समजायचं असतं, उमजायचं असतं, ओळखायचं असतं आणि तशी समज आपण आपल्या मनाला द्यायची असते.
मात्र याला मन तयार होत नाही. कारण आपलं मन संबंधात गुंतलेलं असतं. माणूस भावनेला अधिक महत्त्व देतो. कारण त्यात त्याची त्यातच आत्मतुष्टी असते. हा संबंध इतकाच नियतीच्या आराखड्यात आहे ही समज फार कमी वेळा, कमी लोकांना, कमी प्रमाणात येते. बहुतेक वेळा ती उशिराच आलेली असते. तोपर्यंत युनिव्हर्सच्या या मास्टर प्लॅनमध्ये आपण ढवळाढवळ करत त्याचे दुष्परिणाम भोगलेले असतात.
म्हणूनच स्वतःच्या इच्छेनुसार ज्याने जितका आपल्याशी संबंध ठेवला तोच युनिव्हर्सचा मास्टर प्लॅन समजावा, नियतीच्या मनातली गोष्ट जाणून घ्यावी. हेच प्रारब्ध आणि हेच नशीब. घडणाऱ्या गोष्टी घडणारच आहेत. काही घटना अटळ आहेत.आपण संयमाने, समजदारीने इष्ट आणि अनिष्ट संयोगात समभावाने, कठीण काळात जबाबदारीने आयुष्य जगायचे असते. घडायचे ते घडणारच असे म्हणून परिश्रम किंवा कष्ट मेहनत सोडायची नसते. जग जगाच्या नियमाने चालते आहे तर आपणही आपल्या नियमानुसार चालावे. सर्व काही घडत असताना, उघड्या डोळ्यांनी पाहत असताना, वेगवेगळे अनुभव येत असताना आपण कसे चालायचे याचा आराखडा आपल्याकडे असावा. घडणाऱ्या घटनांना समजदारीने,नियमबद्ध संघर्षाने तोंड द्यावे.
परंतु अखेर ही समज यायलाच हवी की सर्व काही आपल्या मनाप्रमाणे घडणार नाही. अशा अवस्थेतच आयुष्यभर चालणे आहे. म्हणूनच आपणही आपल्या जगण्याचे नियम ठरवावेत. कारण जग त्याच्या नियमानुसार चालत आहे.
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
(संपर्क- 9420015108)
