October 15, 2026

बलराज संघई यांचा कॉलम:श्री गणेशाच्या जयघोषात ‘मोरया’ केव्हापासून?

0
ganpati_1789707026.jpg

सर्व देवता मधील प्रथम पूजनीय श्री गणेश देवाच्या सोबत ” बाप्पा ” हा शब्द अर्थात विशेषण हे पितृस्थानी व पितामह, वडील, सर्व भक्त जीवांचा तारक या अर्थाने, नात्याने जोडले गेले. संस्कृतमधील ‘पितामह’ किंवा ‘बाप’ (वडील) या शब्दांवरून आणि प्राकृत बोली लोकभाषेच्या प्रवाहातून गणपतीसोबत ‘बाप्पा’ हा आदरयुक्त आणि आपुलकीचा शब्द जोडला गेला. श्री गणेशाचा जयघोष करताना ” गणपती बाप्पा मोरया ” असेही आपण म्हणतो. हे मोरया विशेषण कशामुळे? याचेच विश्लेषण या लेखामध्ये आहे. श्री गणपतीसोबत जोडला गेलेला ‘मोरया’ हा शब्द १४ व्या शतकातील थोर गणेशभक्त श्री मोरया गोसावी यांच्या नावावरून आला असून तो नंतर ‘गणपती बाप्पा मोरया’ या जयघोषात समाविष्ट झाला. मंगलमूर्ती मोरया! अशा जयघोषांनी प्रत्येक घराघरात निनादतो. चिंचवड पुण्याचे गणेश भक्त श्री मोरया गोसावी आणि त्यांची भक्ती : ‘मोरया’ या शब्दाचा संबंध थेट त्यांच्याशी आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, १४ व्या शतकात (सुमारे १३७५ च्या सुमारास) मोरया गोसावी यांचा जन्म झाला. त्यांचे आई-वडील वामन भट आणि पार्वतीबाई हे देखील गणपतीचे अनन्य भक्त होते. असे मानले जाते की, त्यांच्या कठोर तपश्चर्येवर आणि भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान गणेशाने त्यांच्या पोटी जन्म घेण्याचे वरदान दिले होते. मोरया गोसावी हे लहानपणापासूनच गणपतीच्या भक्तीत तल्लीन असायचे. ते दरमहा गणेश चतुर्थीच्या दिवशी चिंचवडहून अष्टविनायकांपैकी एक असलेल्या मोरगावच्या श्री मयुरेश्वर मंदिराचे दर्शन घेण्यासाठी तब्बल ९५ किलोमीटर अंतर अनवाणी पायांनी चालत जात असत. मयुरेश्वर भगवान हे मोरावर आरूढ असणारे गणेशाचे रूप मानले जाते. मयुरेश्वराचा दृष्टांत आणि तलावातील स्वयंभू मूर्ती : मोरया गोसावी यांनी ही खडतर वारी सलग ११७ वर्षे अखंडपणे चालू ठेवली. जसजसे त्यांचे वय वाढत गेले, तसतसे शरीर थकले आणि ९५ किलोमीटरची पायपीट करणे त्यांना अशक्य होऊ लागले. आपल्या लाडक्या भक्ताचे हे कष्ट पाहून भगवान मयुरेश्वर प्रसन्न झाले. एके रात्री भगवान गणेशाने मोरया गोसावी यांच्या स्वप्नात येऊन दृष्टांत दिला, “हे भक्ता ! आता तुला मोरगावला येण्याची गरज नाही. उद्या सकाळी जेव्हा तू चिंचवडच्या पवना नदीत/तलावात स्नान करून बाहेर येशील, तेव्हा मी स्वतः तुझ्यासमोर प्रकट होईन.” दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मोरया गोसावी स्नानासाठी तलावात उतरले आणि बाहेर आले, तेव्हा त्यांच्या हातात भगवान गणेशाची एक लहान, अत्यंत तेजस्वी मूर्ती आपोआप आली. ती मूर्ती साक्षात मोरगावच्या मयुरेश्वराचेच रूप होती. मोरया गोसावी यांनी त्या मूर्तीची स्थापना चिंचवड येथे केली. गणपती बाप्पा मोरया’ जयघोषाची सुरुवात चिंचवडमध्ये मूर्तीची स्थापना झाल्यानंतर दूरदूरवरून भाविक तिच्या दर्शनासाठी येऊ लागले. लोक जेव्हा मोरया गोसावी यांच्या दर्शनाला जात, तेव्हा मोरया गोसावी “गणपती बाप्पा” असा जप करत असत आणि भाविक त्यांच्या सन्मानार्थ “मोरया” असा प्रतिसाद देत असत. हळूहळू देव आणि भक्ताचे नाव एकमेकांत इतके विलीन झाले की, लोक गणपतीचा जप करताना “गणपती बाप्पा मोरया” असा एकत्र जयघोष करू लागले. चिंचवड येथील गणेश मूर्ती आणि मोरगावचा मयुरेश्वर यांच्यात कोणतेही अंतर नाही अशी श्रद्धा विद्यमान आहे. आजही मोरया गोसावी यांच्या संजीवन समाधी मंदिरातून दरवर्षी पालखी मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराकडे जाते. अशा प्रकारे एका भक्ताच्या निस्सीम भक्तीमुळे देवाच्या नावाआधी भक्ताचे नाव अमर झाले. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!