मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण २० दिवसानंतर स्थगित!.!
मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारला तीन महिन्यांची मुदत, गणेशोत्सवावरील आंदोलनाचे सावट दूर
बीड | 17 सप्टेंबर 2026
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 20 दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे गुरुवारी पहाटे सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जरांगे पाटील यांनी हा निर्णय घेतला. मात्र, आंदोलन पूर्णपणे संपलेले नसून सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.
सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसे, आमदार प्रसाद लाड आणि आमदार सुरेश धस यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून उपोषण स्थगित करण्याची विनंती केली. चर्चेनंतर सरकारने काही प्रमुख मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
जरांगे पाटील यांनी सरकारला 90 दिवसांचा अर्थात तीन महिन्यांचा वेळ दिला आहे. या कालावधीत संबंधित गॅझेट आणि मराठा-कुणबी नोंदींच्या प्रश्नावर ठोस कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे. तीन महिन्यांत सरकारने अपेक्षित कार्यवाही केली नाही, तर पुन्हा मुंबईकडे आंदोलन नेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
दरम्यान, सरकारकडून जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी सर्व मागण्या अंतिम स्वरूपात पूर्ण झाल्या आहेत असे म्हणणे सध्या योग्य ठरणार नाही. काही मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रक्रिया आणि कायदेशीर बाबी पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाच्या काळात मुंबईमध्ये मोठ्या संख्येने आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशासनासमोर कायदा-सुव्यवस्था आणि गणेशोत्सवाच्या नियोजनाचे आव्हान निर्माण झाले होते. आता मुंबईकडे होणारा नियोजित मोर्चा तूर्तास स्थगित झाल्याने गणेशोत्सवाच्या काळातील परिस्थिती अधिक शांततेत पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सणासुदीच्या काळातील सरकार समोरची अडचण तूर्तास तरी दूर झालेली आहे.
जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले असले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न अद्याप पूर्णपणे निकाली निघालेला नाही. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क !
तुकाराम खोत
