November 29, 2026

गोकुळचे दूध महागले

0
file_00000000c1bc8211a72a5dc19ad729ae

कोल्हापूर
२० नोव्हेंबर
गोकुळचे दूध महागले! म्हशीच्या दुधात ६ रुपये, तर गायीच्या दुधात ४ रुपयांची वाढ
दूध उत्पादकांनाही दिलासा; म्हैस दूध खरेदी दरात ३ रुपये, तर गाय दूध खरेदी दरात २ रुपयांची वाढ; २१ नोव्हेंबरपासून नवे दर लागू
कोल्हापूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या म्हैस आणि गाय दूध खरेदी तसेच विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर ४ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ शनिवार, दि. २१ नोव्हेंबर २०२६ च्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.
दुसरीकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांनाही या दरवाढीचा लाभ मिळणार आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर ३ रुपये, तर गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरातील ३ रुपयांची वाढ ही गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक वाढ असल्याचे सांगण्यात आले आहे.
असे असतील नवीन दूध खरेदी दर
६.० फॅट आणि ९.० एसएनएफ गुणप्रतिच्या म्हशीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५ रुपयांवरून ५८ रुपये करण्यात आला आहे. तर ३.५ फॅट आणि ८.५ एसएनएफ गुणप्रतिच्या गायीच्या दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३७ रुपयांवरून ३९ रुपये करण्यात आला आहे.
या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना महिन्याकाठी सुमारे १४ कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे.
ग्राहकांना आता मोजावे लागणार अधिक पैसे
गोकुळच्या दूध विक्री दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. म्हशीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ६ रुपये, तर गायीच्या दुधाच्या दरात प्रतिलिटर ४ रुपये वाढ करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरात म्हशीच्या दुधाचा दर प्रतिलिटर ७२ रुपयांवरून ७८ रुपये, तर मुंबई आणि पुणे येथे ७८ रुपयांवरून ८४ रुपये होणार आहे. गायीच्या दुधाचा दर कोल्हापुरात ५८ रुपये, तर मुंबई आणि पुण्यात ६४ रुपये प्रतिलिटर होणार आहे.
दरवाढीमागे काय कारण?
सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची वाढती मागणी, कच्च्या मालाच्या किमती, इंधन दरातील वाढ आणि एकूणच वाढलेली महागाई यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे गोकुळकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
गेल्या वर्षभरात दूध उत्पादकांसाठी खरेदी दरात वाढ करण्यात आली होती. मात्र त्या प्रमाणात विक्री दरात वाढ झाली नव्हती. त्यामुळे दूध उत्पादकांचे हित जपण्याबरोबरच संघाचे आर्थिक गणित संतुलित ठेवण्यासाठी विक्री दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
गोकुळचे अध्यक्ष राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत सर्वानुमते दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
शेतकऱ्यांना दिलासा, ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री
गोकुळच्या या निर्णयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असला, तरी दुसरीकडे सर्वसामान्य ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे दूध उत्पादक आणि ग्राहक या दोन्ही घटकांमध्ये या दरवाढीची चर्चा सुरू झाली आहे.
२१ नोव्हेंबरपासून गोकुळच्या नव्या दूध दरांची अंमलबजावणी होणार असल्याने आता ग्राहकांच्या घरगुती बजेटवरही या दरवाढीचा परिणाम होणार आहे.
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!