एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्यासाठी हा पूजा-प्रसाद, पण इतर कुणासाठी हीच ठरते रोजची मजुरी
येल्लम्मा या 2021 मध्ये बांधकामावर मजुरी करायच्या. प्रत्येक पावसाळ्यात बांधकामाची कामे मंदावतात. त्यामुळे त्यांना कामाचा शोध घेणे कठीण जायचे. अशा वेळी त्या भारती मेधी यांच्याशी संपर्क साधायच्या. पुणे येथील कर्वेनगरमध्ये मेधी यांची ‘मोदकघर’’’’ नावाची फॅक्टरी होती. तिथे एखादे काम मिळेल अशी त्यांना आशा असायची. त्या वेळी त्या छोट्याशा फॅक्टरीत रोज साधारण एक हजार मोदकच बनायचे. मेधी आणि त्यांच्या पतींनी 2009 मध्ये हा व्यवसाय सुरू केला होता. ते मोदक आणि इतर पारंपरिक पदार्थ बनवत असत. येल्लम्मा आणि इतर महिला कामाच्या शोधात तिथे पोहोचल्या. तेव्हा मेधी यांना एक गोष्ट लक्षात आली. त्यांना काम करणाऱ्या हातांची गरज होती आणि या महिलांना कामाची गरज होती. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. त्या छोट्याशा सुरुवातीनंतर ‘मोदकघर’’’’चा व्यवसाय विस्तारत गेला. आज तिथे दररोज 18 ते 20 हजार हातांनी बनवलेले उकडीचे मोदक तयार होतात. गेल्या वर्षीचे उत्पादन तब्बल 3 लाख मोदकांपर्यंत पोहोचले होते. यंदा तर पहिल्याच दिवशी 3.5 लाख मोदक बनवण्याचे उद्दिष्ट आहे. गणेश चतुर्थीच्या 10 दिवसांत एकूण 10 लाख मोदक बनवण्याचे ध्येय ठेवले आहे. आता संपूर्ण पुण्यात ‘मोदकघर’’’’च्या पाच शाखा आहेत. दिल्ली, कोलकाता आणि त्याहूनही दूरच्या शहरांतून इथे ऑर्डर येतात. मेधी यांचा मुलगा आकाश आता या व्यवसायात उतरला आहे. तो डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देऊन हा कौटुंबिक व्यवसाय पुढे नेत आहे. म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीला हा विचार मांडला होता- एका कुटुंबासाठी प्रसाद आहे, तो दुसऱ्या कुटुंबासाठी आठवड्याची मजुरी असू शकते. गणेशोत्सव हा केवळ एक धार्मिक सण उरलेला नाही. याचे महत्त्व त्याहून खूप मोठे आहे. हा उत्सव सामाजिक नातेसंबंध घट्ट करतो. लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातून बाहेर काढून पुन्हा कुटुंबे, शेजारपाजार, गावे, बाजारपेठा, कला आणि सामाजिक कामांशी जोडतो. आज या सणाचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे हा सण तरुणाईला एकत्र आणतो. तरुणांवर पारंपरिक सणांपासून दूर जाण्याची टीका होते, अशा वेळी हे घडत आहे. या काळात तुम्ही आसपास पाहिले तर एक चित्र दिसेल. तरुण मंडळी कामावरून सुट्टी घेतात. मंडपाच्या सजावटीसाठी उशिरापर्यंत जागतात. आपला मंडप सर्वांपेक्षा वेगळा दिसावा म्हणून पूर्ण वीकेंड त्यात घालवतात. ते विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात. गर्दीचे नियोजन करतात. विक्रेत्यांशी समन्वय साधतात. देणगी गोळा करतात. सोमवारपासून सुरू होणाऱ्या 10 दिवसांच्या उत्सवासाठी एकत्र येऊन आपला मंडप सजवतात. स्क्रीनसमोर जास्त वेळ घालवल्याचा आरोप केल्या जाणाऱ्या पिढीला गणेशोत्सव काहीतरी वेगळे देतो. बाहेर पडण्याचे कारण देतो. हातांनी काम करण्याची, लोकांना भेटण्याची, एकत्र मिळून काहीतरी घडवण्याची आणि स्वतःपेक्षा मोठ्या कार्याचा भाग होण्याची संधी देतो. आपले सण काही निराळे घडवतात. ती गोष्ट तंत्रज्ञानालाही शक्य नाही. हे सण लोकांना फोन बाजूला ठेवून माणसांशी नाती जोडण्यासाठी प्रेरित करतात. पण या उत्सवांची आणखी एक बाजू आहे. त्यावर आपण पुरेशी चर्चा करत नाही. ती म्हणजे यातून होणारी आर्थिक आणि सामाजिक देवाणघेवाण. बघा, गणेशोत्सव येतो तेव्हा नेमके काय होते? कोणीतरी मूर्ती खरेदी करतो. कोणीतरी ती बनवतो. चित्रकाराला काम मिळते. सजावट करणाऱ्याला ऑर्डर मिळते. फूल विक्रेता कमावतो. सुतार मंडप उभारतो. विजेच्या कामासाठी इलेक्ट्रिशियनला पैसे मिळतात. वाहतूकदाराला फेऱ्या मिळतात. मोदक बनवणाऱ्या महिलेला जास्त ऑर्डर मिळतात. एखाद्या रोजंदारी मजुराला कित्येक दिवसांचा रोजगार मिळतो. लहान दुकानदाराची विक्री वाढते. तरुणांना आयोजनाची संधी मिळते. एखादे कुटुंब स्वतःच्या गावी जाऊन तिथे पैसे खर्च करते. खर्च झालेला हा पैसा कुठे गायब होत नाही. तो एका हातातून दुसऱ्या हातात फिरत राहतो. कदाचित म्हणूनच भारताच्या पारंपरिक कॅलेंडरमध्ये वर्षभर एवढे सण असतात. आपल्या पूर्वजांनी एकत्र बसून एखाद्या आर्थिक धोरणासारखे हे सण आखले होते, असे आपण मानू नये. खरे तर त्यांनी संस्कृतीची निर्मिती केली. तिचे जतन केले आणि ती साजरी केली. यात वर्षभर वस्तूंची वाटणी, प्रवास, खरेदी, निर्मिती, खाणे-पिणे, देणे आणि भेटणे सतत चालत राहायचे. परिणामी एक अर्थव्यवस्था विकसित झाली. तेथे पैसा एका कुटुंबात, एका व्यवसायात किंवा एकाच्याच खिशात तुंबून न राहता, संपूर्ण समाजात खेळता राहिला. फंडा असा की – आपल्या परंपरेत प्रगतीला पुढे नेण्याची मोठी शक्ती आहे. म्हणूनच आज संपूर्ण देशात हाच एक जयघोष ऐकायला मिळतो – ‘आला रे आला, गणपती आला!
