November 29, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम: आमची पदवी आमच्या आई-वडिलांच्या शहाणपणापेक्षा मोठी ठरू शकत नाही – N Raghuraman Column: Wisdom Beyond Degrees

0
n_raghuraman_1795890012868.jpg

5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या आठवड्यात सिमल्याच्या सफरीत मला भलखू यांची रोमांचक गोष्ट समजली. ते स्थानिक रहिवासी होते. कालका-सिमला रेल्वेमार्गाच्या उभारणीत त्यांनी ब्रिटिश अभियंत्यांना मदत केली होती. त्यांच्या गोष्टीचे वेगळेपण आहे. त्यांच्याकडे अभियांत्रिकीची पदवी नव्हती. मात्र अभियंत्यांना तीव्र गरज असते, अशी एक गोष्ट त्यांच्याकडे होती—पहाडांची अजोड जाण.

कल्पना करा. एखाद्या डोंगराच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम सुरू होते. आतून बोगद्यांनी एका नेमक्या बिंदूवर येऊन मिळायचे असते. शतकाहून अधिक काळापूर्वी रेल्वे उभारणाऱ्या अभियंत्यांपुढे हे मोठे आव्हान होते. त्यांच्याकडे मोजमापाची साधने होती आणि तांत्रिक कौशल्येही होती. पण डोंगरांची स्वतःची गुंतागुंत असते. सांगतात की या कामाचे प्रमुख कर्नल बरोग दोन्ही बाजूंनी सुरू केलेले खोदकाम एका रेषेत आणण्यात अपयशी ठरले. या चुकीबद्दल अधिकाऱ्यांनी त्यांना खडसावले. दंडही ठोठावला. पुढे त्यांनी आत्महत्या केली. बोगद्याचे काम अर्धवटच राहिले.

यानंतर रेल्वेचे पुढचे मुख्य अभियंते एच. एस. हॅरिंग्टन यांनी भलखू यांची मदत घेतली. भलखू आजच्या हिमाचल प्रदेशातील चैलजवळच्या झज्जा गावचे रहिवासी होते. डोंगररांगांत घालवलेल्या वर्षांनी त्यांना या भूप्रदेशाची सखोल जाण दिली होती. याआधी त्यांनी हिंदुस्तान-तिबेट रस्त्याच्या कामातही हातभार लावला होता. दुर्गम डोंगराळ भागात वाटा ओळखण्याचे त्यांचे कसब ब्रिटिश अधिकाऱ्यांनी तेव्हाच हेरले होते. म्हणतात, भलखू उतारावरून हातात काठी घेऊन चालत. जमिनीवर काठी टेकवून ते लक्षपूर्वक तिचा आवाज ऐकत. डोंगरांशी असलेल्या त्यांच्या घट्ट ओळखीमुळे बोगद्यासाठी योग्य मार्ग सापडणे सोपे झाले. अखेर हॅरिंग्टन यांच्या देखरेखीत बोगद्याचे काम पूर्ण झाले. हिमाचलच्या वारसा नोंदींमध्ये रेल्वेचा मार्ग ठरवण्यातील भलखू यांच्या योगदानाची दखल घेतली गेली आहे. 96 किलोमीटर लांबीचा कालका-सिमला रेल्वेमार्ग 1903 मध्ये सुरू झाला. आज तो युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट आहे. सिमल्यात 2011 मध्ये सुरू झालेले ‘बाबा भलखू रेल्वे संग्रहालय’ त्यांच्या आठवणी जपून आहे. पण आज तरुणांसाठी भलखू यांच्या गोष्टीचा अर्थ काय?

अशा कुटुंबाची कल्पना करा. येथे आई-वडिलांना महाविद्यालयात जाण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी कष्ट केले आणि मुलांना शिकवण्यासाठी अनेक त्याग केले. मुले कुटुंबात पहिल्यांदा पदवीधर झाली. त्यांना चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या. ती अस्खलित इंग्रजी बोलतात. तंत्रज्ञान वापरतात आणि अशा जगात सहज वावरतात, जे कदाचित त्यांच्या आई-वडिलांना पूर्णपणे उमगणारही नाही. यातूनच काही मुले कदाचित असे मानू लागतात की शिक्षणाने त्यांना ज्यांनी घडवले, त्यांच्यापेक्षा अधिक हुशार किंवा श्रेष्ठ बनवले आहे. इथेच भलखू यांची गोष्ट एक मोलाचा धडा देते.

आपल्या आई-वडिलांना कदाचित लॅपटॉप चालवता येत नसेल, एआय समजत नसेल किंवा एखादी गुंतागुंतीची आर्थिक बाब त्यांना सांगता येत नसेल. पण त्यांनी आयुष्याच्या खडतर वाटा चालायला शिकले आहे. त्यांना पैशाची किंमत कळते. कारण त्यांनी पैशांच्या टंचाईत संघर्ष केला आहे. त्यांना नात्यांची महती समजते. कारण कठीण काळातही त्यांनी ती जपून ठेवली आहेत. त्यांना संयमाचा अर्थ ठाऊक आहे. कारण आयुष्याने वेळोवेळी त्यांच्या धीराची परीक्षा घेतली आहे. कोणताही तज्ज्ञ उपलब्ध नसतानाही त्यांनी प्रश्नांची उत्तरे शोधून काढली आहेत.

भलखू यांनी अनुभवातून डोंगर समजून घेतले. आपल्या आई-वडिलांनी जगण्याच्या अनुभवांतून आयुष्याच्या खाचखळग्यांची समज बनवली आहे. त्यांच्याकडे भले पदव्या नसतील. पण त्यांनी असे शहाणपण कमावले आहे, जे कोणतेही विद्यापीठ देऊ शकत नाही. औपचारिक शिक्षणाचा अभाव म्हणजे बुद्धिमत्तेचा अभाव समजू नये. आपल्या पदव्या करिअर घडवायला मदत करू शकतात; पण आई-वडिलांचा अनुभव आपल्याला जगण्याची वाट दाखवेल. आपल्या कुटुंबातील पहिले पदवीधर असू शकतो. पण आयुष्य समजून घेणारे पहिले माणूस नाही.

मोबाइलवर हे सदर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

मोबाइलवर हे सदर ऐकण्यासाठी QR कोड स्कॅन करा.

QuoteImage

फंडा असा की – आपल्याला कुणाच्या तरी त्यागामुळे शिकायला मिळाले. आपल्या शिक्षणाने त्यांना कमी लेखण्याकडे नेऊ नये. आपण भले पुस्तके वाचायला शिकलो असू. पण लक्षात ठेवा की आई-वडिलांनी आयुष्यभर जगणे वाचायला शिकले आहे.

QuoteImage

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!