पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:मन रिकामे केले, तरच आत्मा त्यात राहू शकेल
डिजिटल उपकरणांच्या अतिवापरामुळे चिडचिडेपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, मळमळ असा त्रास होतो. आता सर्वच जण ही गोष्ट मान्य करत आहेत. शिवाय माणसाचे मन या गोष्टी अधिक वाढवते. मन समजण्यासाठी आणि समजावण्यासाठी अनेक प्रयोग केले जातात. मन काय आहे, हेच जर आपल्याला समजले नाही, तर कदाचित आपण कधीही शांत होऊ शकणार नाही. अनेक महात्म्यांनी मनासाठी अनेक रूपके दिली आहेत. कुणी त्याला आरसा म्हटले आहे, तर कुणी आकाश. मन समजावून सांगण्यासाठी आणखी एक रूपक खूप उपयुक्त आहे. आपले शरीर एक भिंत आहे आणि त्या भिंतीच्या आत एक घर असते. मग त्या घरात कुणीतरी राहणारे असते. शरीर जर भिंत असेल, तर जे घर आहे, ते मन आहे. जर घरच रिकामे नसेल, तर राहणारा कुठे राहील? मन अनेक गोष्टींनी भरलेले असते. मन रिकामे केले, तरच त्यात आत्मा राहू शकेल. आणि हे मन रिकामे करण्यासाठी दररोज किमान दोन वेळा ध्यान नक्की करा. ध्यान ही मन रिकामे करण्याची प्रक्रिया आहे.
