October 15, 2026

एन. रघुरामन यांचा कॉलम:शिक्षक स्वतःच एक धडा बनले

0
uyo5j0_1788549914.jpg

एखाद्या शाळकरी विद्यार्थ्याला विचारा. पीए (पब्लिक ॲड्रेस) प्रणालीवर त्याचे नाव पुकारले जाते आणि त्याला ऑफिसमध्ये बोलावले जाते, तेव्हा त्याला कसे वाटते? त्या काही मिनिटांत त्याच्या हृदयाची धडधड मोजून पाहा. विश्वास ठेवा, गाड्यांचा स्पीडोमीटरही त्याच्या वेगाची बरोबरी करू शकणार नाही. मी शाळेत होतो, तेव्हा पीए प्रणाली नव्हती. शिपाई वर्गाच्या दारात येऊन मोठ्याने सांगायचा, ‘मॅडम, प्रिन्सिपल सर रघूला बोलावत आहेत.’ एवढेच पुरेसे असायचे. संपूर्ण वर्गाने नाव ऐकताच प्रत्येकाचे अंदाज सुरू व्हायचे. पण रघूच्या हृदयाची धडधड कोणत्या वेगाने चालली आहे, याचा विचार कुणीच करत नसे. वेगळे शिक्षक यावर वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया द्यायचे. कुणी विचारायचे, ‘काय झाले रघू? असे काय केलेस की प्रिन्सिपल सर बोलावतात?’ हे शब्दच हृदयाचे ठोके कोणत्याही मर्यादेपार नेण्यासाठी पुरेसे असायचे. मग आमच्या एक ललिता टीचर होत्या. त्या इतिहास शिकवायच्या. त्या शिपायाला फक्त सांगायच्या, ‘मी त्याला दोन मिनिटांत पाठवते.’ शिपाई गेल्यावर त्या रघूला जवळ बोलवून सांगायच्या, ‘ऑफिसमध्ये जा आणि थोडे खडू घेऊन ये. तिथे तुला कशासाठी बोलावले आहे, हेही विचारून ये.’ हातात एक काम असल्याने हृदयाची धडधड थोडी शांत व्हायची. एखाद्याला वादळाचा सामना करण्यासाठी शांत कसे तयार करायचे, हे मी ललिता टीचरकडून शिकलो. मग एक दिवस आमचे प्रिन्सिपल नागराजन सर स्वतः आमच्या वर्गात आले. आम्ही भीतीपोटी उभे राहिलो. ते शांतपणे वर्गात फिरले. त्यांनी एका मुलाला सोडून सगळ्यांशी गप्पा मारल्या. त्या मुलाचे नाव मी येथे सांगणार नाही. ते त्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ‘माझ्यासोबत चल’ आणि खांद्यावर हात ठेवूनच त्याला बाहेर घेऊन गेले. वर्गातील सर्वांच्या डोळ्यांत आश्चर्य होते. तो वर्गातील सर्वात हुशार आणि गुणी विद्यार्थ्यांपैकी एक होता. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये बोलावले जावे, असा तो मुलगा नक्कीच नव्हता. त्याने असे काय केले असेल की प्रिन्सिपल सर स्वतः त्याला न्यायला आले. यावर आम्ही लगेच कुजबुजू लागलो. खूप उशिरा आम्हाला समजले की, अवघ्या 30 मिनिटांपूर्वी त्या मुलाच्या घरातील एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्याच्या कुटुंबातील एक जण त्याला घरी नेण्यासाठी आला होता. संवेदनशीलतेची जोड असते. तेव्हाच अधिकार किंवा सत्ता तेव्हाच अर्थपूर्ण ठरते. हे मी नागराजन सरांकडून शिकलो. एक पंडित सर होते. ते आम्हाला तमिळ शिकवायचे. ते नेहमी पांढरा शर्ट आणि पॅन्ट घालायचे. पाच वर्षे मी त्यांना पाहिले. या काळात त्यांनी कधीही आपल्या कपड्यांचा रंग बदलला नाही. एक दिवस काही विद्यार्थ्यांनी पंडित सरांना मुख्य रस्त्यावरून चालताना पाहिले. त्यातील एकाने गुपचूप त्यांच्या पाठीवर शाई उडवली आणि तो पसार झाला. प्रत्येक गुन्हेगार आपल्यामागे काही पुरावा सोडतो, तसे एक जण हसला. दोघे पळून गेले आणि उरलेल्यांनी अतिशय संशयास्पद आणि निरागस हसून सरांना नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी पंडित सरांनी त्यांना आपल्या डेस्कजवळ बोलावले. त्यांनी संपूर्ण वर्गाला सांगितले, ‘काल माझ्या शर्टवर कुणी शाई उडवली, हे मला माहीत आहे. पण मी तुम्हाला तमिळचे महान कवी तिरुवल्लुवर यांचा एक दोहा ऐकवतो.’ त्यांनी समजावून सांगितले की, एखादा माणूस तुमच्याशी वाईट वागतो, त्याच्याशी चांगुलपणाने वागणे हीच त्याच्यासाठी सर्वात मोठी शिक्षा आहे. यामुळे त्याला आपल्या चुकीची जाणीव होते आणि तुम्ही सूडाच्या भावनेतून मुक्त होता. पंडित सरांकडून मी क्षमाशीलतेची ताकद शिकलो.

फंडा असा की- काही शिक्षक हे स्वतःच एक संस्था असतात. या तिन्ही शिक्षकांपैकी आज कुणीही जिवंत नाही. पण इतक्या वर्षांनंतरही त्यांची आठवण काढली जाते, ती केवळ त्यांनी विषय शिकवले म्हणून नाही, तर आपल्या कृतीतून त्यांनी आम्हाला एक चांगला माणूस कसा बनायचे, हे शिकवले म्हणून!

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!