August 30, 2026

Living In Present Is Meditation; Balraj Sanghai Column On Mindfulness

0
balraj-sanghai_1785126216.jpg

बलराज संघई6 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ध्यान करायचे नसते, ध्यान लावायचे नसते. तर ध्यान सहज घडत असते. आपल्या रोजच्या घाईच्या जीवनात वेळ कुठे आहे की ध्यान केले जाईल? ध्यानासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही.आपले जे काही काम आहे, ते पूर्ण लक्ष केंद्रित करुन, इतर गोष्टींचा विसर करुन करणे हेच सहज ध्यान.

जी कृती प्रवृत्ती चालू आहे ती संपूर्ण लक्षपूर्वक, मौन साधून करत असताना वास्तविक ध्यानमग्नतेचा अभ्यास होईल. मग काही करत नसताना या अवस्थेत जाणे हे खरे ध्यान घडेल. जे मुद्दाम करावे लागले ते ध्यान कसे?

निष्क्रियता ध्यान नक्कीच नाही. संपूर्ण सक्रियता हे ध्यान आहे. आपल्यात अनंत अशी आत्मशक्ती आहे, ती ऊर्जा आत्म-समृधीच्या दिशेने संपूर्ण सक्रीय करणे हेच उत्कृष्ट ध्यान असेल.

लक्ष केंद्रित करणे किंवा ध्यान हे सकारात्मक असावे. विकृती किंवा जे आत्म्याचे स्वभाव नाहीत ( विभाव आहेत ),जीवाचे मूळ लक्षण नाहीत अशा गोष्टीत माणसाला लोभ, मोह,आवड आणि उत्साह असतो. मूळ आत्मस्वरूपाला विकृत करणाऱ्या अशा गोष्टींमध्ये निरस राहणे, रस,आवड न ठेवणे याचा अभ्यास, हीच ध्यानाची प्रारंभिक तयारी.

आपण आपल्यात असणे, आत्म स्वभावांत रममाण असणे, स्व-केंद्रीत असणे, आपल्या एक स्व-आत्म्याशिवाय इतर जे काही आहे ते सर्व भौतिक जगातील पदार्थ, यांनाच ‘पर’ असे म्हटले आहे. यात आपले स्वतःचे शरीरही आले.

वास्तविक पाहता ‘ ध्यान ‘ ही सर्वोत्कृष्ट शुद्ध आत्म अवस्था प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने जीवाला,आत्म्याला, आत्मशक्तीला विकृत करणारी जी तत्व आहेत जसे की क्रोध, मान,माया, लोभ, मोह, दंभ,मत्सर, अत्याधिक इंद्रिय विषय लोलुपता यांचा अभाव करुन आत्म्याच्या मूळ शब्द स्वभावाची प्राप्ती विशिष्ट साधनेतून केली जाते.

यासाठी सर्वप्रथम एकाग्रता साधावी लागते. ही एकाग्रता शरीर स्थिर करून चंचल मनाला आत्मस्थानी केंद्रित करणे अशी असते. शरीर स्थिर करण्यासाठी आसन धारण करणे. शारीरिक अवयवांची चंचलता थांबवणे, शरीरातील आंतरिक ऊर्जा प्रवाहित करण्यासाठी मुद्रा धारण करणे हे आवश्यक. तसेच चंचल मनाला स्थिर करण्यासाठी प्राणायाम, दीर्घश्वास, तणाव मुक्तीचे प्रयोग अशा प्रक्रिया असतात. या सर्व पूर्व तयारीलाच ध्यान समजणे अत्यंत चुकीचे आहे. परंतु दुर्दैवाने अशीच धारणा बहुसंख्य लोकांमध्ये आज रूढ आहे.

स्व केंद्रीत असणे याचाच अर्थ असा की गतकाळाच्या स्मृती नको, भविष्यकाळातील चिंता आणि कल्पना नको. मग उरतो तो मात्र केवळ फक्त वर्तमान. या वर्तमान क्षणाला पकडून मनात कुठलेही विकार न ठेवता शुद्ध आणि मूळ आत्मिक स्वरूपाच्या प्राप्तीसाठी एकाग्र होणे हेच तर ध्यान आहे.

हे ध्यान साधत असताना शरीरामध्ये अनेक ऊर्जा उत्पन्न होतात, त्यातच काहीतरी साध्य झाल्याची प्रचिती येत असते. त्याला सिद्धी असेही म्हणतात. या सिद्धीकडे फारसे लक्ष द्यायचे नसते. आपला मुख्य उद्देश शुद्ध स्वरूपात आत्मस्वरूप विकसित करणे हा कधीच विसरायचा नसतो.

ध्यान केल्याने, ध्यान उत्पन्न झाल्याने आणि ध्यान साधल्याने आपल्या आत्म्याच्या ठिकाणी अंतर्गत असलेल्या अनेक शक्तींचे उद्घाटन होते जसे की अनंत ज्ञान, अनंत दर्शन , अनंत शक्ती आणि अनंत चारित्र्य. यासह आपला शुद्ध आत्मा विराजमान होणे हेच ध्यानाचे परमसाध्य आहे. हीच सिद्ध अवस्था.

(संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!