डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आई-वडील नोकरीवर गेल्यानंतर लहान मुलांची काळजी कोण घेतो?
डे केअरमधील लहान मुलास प्रेमाची गरज असते. मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब, खेळणी किंवा अंगाई गीताची गरज असते.बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रात दोन वर्षांपर्यंतच्या मुलांशी अमानुष वागणूक झाल्याचा प्रकार समोर आला आणि पालकांचा विश्वास हादरला. आरोपानुसार मुलांना बाथरूममध्ये कोंडणे, टॉयलेटच्या जेटमधून पाणी मारणे अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले. पाच केअरगिव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित केंद्र बंद करण्यात आले आहे. ही घटना कोणत्याही अनधिकृत पाळणाघरात नव्हे, तर देशाची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणाऱ्या शहरातील कॉर्पोरेट परिसरात घडली. आपली मुले सुरक्षित आहेत, असा विश्वास पालक अशा केंद्रांवर ठेवतात. त्यामुळे हा प्रश्न अधिक गंभीर ठरतो की, आई-वडील कामावर असताना त्या बदल्यात किंमत नेमकी कोण मोजत आहे? शहरी मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आज दोन्ही पालकांची कमाई ही चैनीची गोष्ट राहिलेली नाही. घर, शिक्षण, आरोग्य, विमा, गृहकर्जाचे हप्ते आणि वाढत्या खर्चामुळे दोघांनीही नोकरी करणे अनेकदा अपरिहार्य बनले आहे. महिलांचे आर्थिक स्वावलंबन व करिअरही त्याच्याशी जोडलेले आहे. मात्र विश्वासार्ह चाइल्डकेअरची सुविधा नसेल तर अनेक महिलांना नोकरी सोडावी लागते. त्यामुळे पाळणाघरे आवश्यक आहेत; पण त्याहून महत्त्वाची आहे त्यांची सुरक्षितता. दोन्ही पालक दीर्घकाळ कामावर असतील तर मुलांचा दिवस डे-केअर, आया, मोबाईल स्क्रीन, विविध उपक्रम आणि थकलेल्या पालकांत विभागला जातो. वेळ नसेल तर प्रेमही केवळ व्यवस्था बनते. उपस्थिती नसेल तर जिव्हाळाही व्यवस्थापनापुरता मर्यादित राहतो. मुलांना मात्र मोबाईलशिवाय एकत्र जेवण, झोपण्यापूर्वी गोष्ट, प्रश्नांची उत्तरे, शांत वातावरण आणि सुरक्षित झोप यांची गरज असते. बालपण म्हणजे शाळा सुरू होण्यापूर्वीचा प्रतीक्षाकाळ नाही. याच काळात मुलांचा शारीरिक, मानसिक, भावनिक विकास सर्वाधिक वेगाने होतो. युनिसेफ बालपणातील सुरुवातीचा काळ हा पोषण, सुरक्षितता, प्राथमिक शिक्षण आणि संवेदनशील संगोपनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानते. डब्ल्यूएचओ आणि युनिसेफ जन्मानंतरच्या पहिल्या 1,000 दिवसांवर विशेष भर देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (एनएफएचएस-6)नुसार, पाच वर्षांखालील 29.3% मुले खुंटलेल्या वाढीची, 19% अशक्तपणाची आणि 31.8% कमी वजनाची समस्या झेलत आहेत. मुलांचा विकास केवळ अन्नामुळे होत नाही; तर प्रेमळ स्पर्श, संवाद आणि विश्वास यांच्यामुळेही होतो. गेल्या काही दशकांत अनेक देशांनी चाइल्डकेअर ही केवळ खासगी व्यवस्था नसून सामाजिक पायाभूत सुविधा असल्याचे मान्य केले आहे. कारण मुलांना योग्य संगोपनाची गरज असते, तर प्रौढांना काम आणि वैयक्तिक आयुष्यात समतोल राखण्याची आवश्यकता असते. यावर उपायही स्पष्ट आहेत. प्रत्येक पाळणाघर आणि डे-केअर केंद्राची नोंदणी, नियमित तपासणी आणि लेखापरीक्षण बंधनकारक असावे. केअरगिव्हरना योग्य वेतन, प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण देखरेख मिळावी. त्यांना बालविकास, सुरक्षित वर्तन आणि अहिंसक शिस्त यांचे प्रशिक्षण दिले जावे. नियोक्त्यांनी चाइल्डकेअरकडे सुविधा म्हणून नव्हे, तर जबाबदारी म्हणून पाहिले पाहिजे. लवचिक कामाचे तास, संमिश्र (हायब्रिड) कामकाज, निश्चित कामाचे तास आणि आई-वडिलांसाठी पुरेशी रजा यांमुळे मुलांना त्यांच्या पालकांचा अधिक वेळ मिळू शकतो. अखेरीस, प्रश्न केवळ रोजगाराचा नाही; तर मुलांच्या सुरक्षिततेला आणि भावनिक गरजांना केंद्रस्थानी ठेवून समाजाची रचना करण्याचा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.)
