पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:विवाहात एकमेकांच्या आत्म्याला स्पर्श केला जावा
जीवनसाथी हा केवळ शरीराचा विषय नाही. या नात्याची सुरुवात देहापासून होते आणि शहाणपण हे आहे की त्याचा शेवट आत्म्यावर व्हावा. संपूर्ण जगात सध्या या नात्याला एक नवे रूप मिळत आहे. गेल्या काही दिवसांत मी कॅनडाच्या प्रवासावर असताना माझी काही जोडप्यांशी ओळख झाली आणि मला जाणवले की ते जसे दिसत होते, तसे प्रत्यक्षात नव्हते. त्यांची शांतता आणि एकत्र राहणे बऱ्याच अंशी अभिनयासारखे वाटत होते. कुटुंब, संतती, भविष्य आणि आर्थिक सुरक्षिततेचा समन्वय साधल्यानंतरही बहुतेक जोडपी एकमेकांबद्दल कुठे ना कुठे असमाधानी होती. एका जोडप्याने मला सांगितले की किंचितही मतभेद झाले, तरी आम्ही वेगळे व्हावे अशी इच्छा होते. पण आम्ही आमच्या आई-वडिलांना मोठमोठे मतभेद असूनही एकत्र राहताना पाहिले आहे. ते बरोबर होते की आम्ही? आपण हे नाते का ओढत राहावे? आम्हाला मुले झाली, मुले मोठी होत आहेत, मग आता या नात्याचे महत्त्व काय? तेव्हा मला ऋषी-मुनींनी विवाहसंस्कारात रचलेल्या सप्तपदीची आठवण होते. तिचा आंतरिक भाव असा आहे की या नात्यात एकमेकांच्या आत्म्याला स्पर्श केला जावा. आपण केवळ देहावर हे नाते टिकवून ठेवले, तर ते नाते कोमेजून जाईल.
