August 30, 2026

बलराज संघई यांचा कॉलम:विविधता असतेच, पण एकतेसाठी सहन करणे महत्त्वाचे

0
balraj-sanghai_1787130845.jpg

एकता या शब्दाचा शाब्दिक अर्थ ऐक्य असा होतो. सामाजिक स्वरूपामध्ये विचार केल्यास एकजूट असा लक्षात येतो. दोन पेक्षा अधिकांचा एक विचारांचा गट म्हटल्यास एकी वाटते. निरंतर ज्यांच्यातील ऐक्य अनेक वर्ष अबाधित टिकून राहिल्यास एकोपा म्हटलं जातं. एकता या अर्थाचा विचार करायचा झाल्यास विरुद्धार्थी वचनाकडे जावे लागते. अनेकता, विभाजन, दुरावा, फूट, विसंवाद, विविधता, असे अनेक शब्द सुचतात. या सर्वांचा अभाव असणे म्हणजे एकता. एकता ही मानसिक अवस्था आहे आणि ती क्रिया आणि भौतिक स्वरूपावर घडून येते. ऐक्य होण्यासाठी कोणालातरी समजून घ्यावं लागतं. एकजूट होण्यासाठी काहीतरी समर्पण करावे लागते. एकोपा निर्माण व्हायचा असेल तर दुसऱ्यांना सतत सहन करावं लागतं. याचाच अर्थ असा की एकता ही अवस्था समजूतदारपणाची आहे. विविधता सर्व बाबतीत असते. बौद्धिक,आर्थिक, परिस्थिती, वर्ण, जाती, आवड, निवड, क्षेत्र… तसेच वैयक्तिक विचार आणि मान्यता. या सर्वांमुळे विविधता, विषमता जाणवते आणि एकतेला तडा बसतो. म्हणून ऐक्य आणि एकता घडून येण्यासाठी दुसऱ्याचे विचार समजून घेण्याची आणि स्वतः समजदारपणा घेण्याची गरज असते. स्वातंत्र्याच्या काळामध्ये, आणि त्यापूर्वी ही अनेक वर्षापासून सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य समजून काही व्यक्तींनी क्रांती घडवून आणली व भारतीय समाजाचे नेतृत्व करत विविधतेमध्ये एकता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. असंख्य क्रांतिवीरांनी प्राणाची बलिदान दिले. मात्र त्या बलिदानापासून इतर अनेकांनी प्रेरणा घेतली. व ऐक्यातून ध्येयप्राप्ती चा विचार पुढे नेला. त्यामुळेच आज आपण स्वतंत्र भारत पाहत आहोत. मी किंवा माझेच खरे, माझाच विचार महत्त्वाचा. मीच तेवढा व्यवस्थित, हुशार, असे समजून,म्हणून चालत नाही. सर्व प्रकारच्या लोकांना एकत्र करून समुदाय बनवून त्यांच्यातील विविधतेमध्ये काय सारखे आहे आणि कोणता उद्देश एक आहे हे सांगितल्याने ऐक्य निर्माण होते. म्हणून या संदर्भात असे म्हणावे वाटते की काय वेगळेपणा आहे सोडून देऊन एका उद्देशासाठी अनेकांनी एकत्र येऊन केलेली कृती निश्चितच उत्कृष्ट ध्येयाच्या प्राप्तीला जाते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!